Thanks to esakal 11-Jan-2019
Thanks to satish vaijapurkar
शिर्डी - सकाळचे साडेनऊ वाजले की शंभराहून अधिक महिला ताराबाईंच्या घरासमोर जमतात. त्यांच्यापाठोपाठ काही वाहनेही येऊन उभी राहतात. दहाच्या सुमारास ताराबाई बाहेर येतात. त्यांच्या सांगण्यावरून महिला गटागटाने वाहनात बसून रवाना होतात. ताराबाई मग निश्चिंत होतात.
कोण आहेत या शंभराहून अधिक महिला? कोणाची वाहने आहेत ती? आणि कोण आहेत ताराबाई? असे अनेक प्रश्न हे दृश्य पाहणाऱ्याला पडतात. उत्तर म्हणजे रोजगारासाठी या महिला तेथे येतात आणि वाहनांमध्ये बसून शेतमजुरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना होतात. फक्त कोणाच्या शेतावर कोणी जायचे, याबाबतचा निर्णय ताराबाई घेतात. गेल्या पस्तीस वर्षांपासून हा शिरस्ता आहे. यातून शंभराहून अधिक महिलांना हक्काचा रोजगार मिळतो आणि शेतकऱ्यांच्या शेतातील कामेही अडून राहत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही महिलेवर पगार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची खबरदारी स्वतः घेतात.
ताराबाई साळुंके (वय ७०) या एकरुखे येथील रहिवासी. गोरगरीब महिलांना वेळच्या वेळी रोजगार मिळावा आणि त्यांच्या संसाराला हातभार लागावा, यासाठी निरक्षर असलेल्या ताराबाईंनी ३५ वर्षांपूर्वी महिलांचा गट तयार केला. शेतकऱ्यांना मजुरांची आवश्यकता होतीच. मग ताराबाईंनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मजुरांची गरज असलेल्या शेतांवर ताराबाई गटागटाने महिलांना पाठवत. मजुरी स्वतः ठरवून ठरलेल्या तारखेला शेतकऱ्यांकडून जमा करून महिलांना वाटप करीत. हळूहळू ताराबाईंकडे कामासाठी महिलांची रांग लागली आणि काम करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांचीही.
सोंगणी आणि खुरपणीच्या हंगामात बऱ्याचदा रोजंदारी न करता ठेका पद्धतीने या कामाचे सौदे केले जातात. विशेष म्हणजे त्याची कुठेही लिखित नोंद नसते. दर आठवड्याला शेतकऱ्यांकडून मजुरीचे पैसे ताराबाईंकडे जमा होतात. ही रक्कम सव्वा लाख रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंत असते. गेल्या पस्तीस वर्षांत एकदाही हिशेबात चूकभूल झाली नाही.
एकरुखे येथे ताराबाईंचा गौरव
ताराबाई केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर शंभरावर शेतमजूर महिलांचा वर्षाकाठीचा पाऊण कोटीहून अधिक रकमेचा हिशेब सांभाळतात. या कामाची दखल घेऊन पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात एकरुखे येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
Web Title:woman employment tarabai salunke motivation