Saturday, 25 July 2015

Satute to Prajakta Gavhane for breathless lyrics



Prajakta Gavhane's Lyrics

Breathless Marathi Song / ब्रेथलेस मराठी गीत

Prajakta Gavhane
Great lyrics for breathless ( sung by bela shende)

मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले
वाटे सोडू नये गाव, आसू डोळयांस या सांगे
गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे
धागे पाणंदीचे मनी, गाव आठवांचा जागे
सय मनात मावेना, धग उरात सोसेना
सोस सोसण्याचा भारी, त्याला वेसच दिसेना
वेळू लपेटून वाहे, माझ्या गावची ही नदी
जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती
माती भुरळ घालते, नाही विरळ हे नाते
नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते,
गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण
उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन,
गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव,
शीव ओलांडता खूपे, जसा निवडुंगाचा पेव,
मन इथेच दंगते, मन इथेच सांडते
ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते,
मन वाऱ्यावर वाहे
वारा चाफ्याशी या बोले
चाफा रामाच्या पुढयात
माझी भातुकली मांडे,
बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर,
डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर
घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ,
जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ,
माझा वाडा चिरेबंदी,
भव्य दार हुरमंजी,
मन चौकातच मध्ये
घुटमळे वृंदावनी,
घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर
त्याचा रूबाबच सांगे, कुणा नाही त्याची सर
मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा
सांज पहाटेला दुमदुमे सनई चौघडा
सदर उजव्या अंगाला, पुढे सोनाराचा सोपा
सदा आपुलकी रांधे माझ्या चुलीचा हा खोपा
माझ्या वाडयातच गोठा आणि तबेलाही तिथं
उभा मर्जीतला घोडा, गाई नांदतात इथं
अश्शा वाडयात या माझ्या
साऱ्या आठवणी ताज्या
राम पालखीला येई
त्याचा किती गाजावाजा
देवघरी ही समई, सांज तेलवात तेवे
गुण्या गोविंदाने गाई, इथे नाही हेवे-दावे
ऐकू येई घंटानाद, संगे मायेची ती हाक
ये गं परतूनी पोरी.. सांगे निरोपाचा हात
सुने रान माझ्याविना, सुने शिवार फुलेना,
सुनी तट्टयाची ती गाडी, सुने मोटेचे ते पाणी
कानी नाही झुळझुळ, नाही घुंगुराची माळ
जोडी खिल्लारी राहिना, नाही ऊसाचं गुऱ्हाळ
गेली भलरी विरून, नाही कापणीची मजा
गेले गोफण नि विळा, गेली चावडीची सजा,
कोण पुसे पावलीला, आधल्याला, आठव्याला,
कोण पुसे माणसाला, पिंपळाच्या मुंजाबाला
आज पडका झडका गाव, परका परका वाटे
वाटेतले तळे एकाएकी पार आटे
धूमी धुमसते आत, तिला उंडयाचीच आस
पाणी शेंदताना जस्सा लाडे विहीरीचा जाच,
काच सुटला कधीचा, जीव मातीतच मळे
सूरपारंब्या मारूनी जीव हुतुतूही खेळे
जीव पारिजात होई, जीव निर्माल्यात सुके
जीव टाळात कुटूनी, पायी विठूच्या या झुके
जीव चोपाळयात झुले, जीव गवळणीत डोले
जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले,
जणु त्याने दाखविली मला उजेडाची वाट,
वाट चालायाला हवी कशी फिरवू मी पाठ,
पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा,
ओढी मागे मागे जीव, पडे मायेचाच वेढा
डोळे भरूनीया येती, गळा दाटूनी गं येतो
मातीच्या या विरहाने जीव कस्सानुसा होतो,
दूरदूरच्या देशांना.. दाही-दाहीच्या दिशांना मला जायलाच हवे, मला जिंकायाला हवे,
'लेक परक्याचे धन' मला खोडायाला हवे,
माती देईलच बळ, माती दावील आभाळ,
घरी परतूनी येता, माती करील जवळ!!

No comments:

Post a Comment