Sunday, 19 September 2021

मुक्ती by अ‍ॅड. अनंत खेळकर

 i take inspirations from

adv. anant khelkar


मुक्ती

अ‍ॅड. अनंत खेळकर


उन्हात पाखरे

झाली लाही लाही

पाजलेच नाही

पाणी त्यांना


अजीर्णच झाले

तुला तुझे खाणे

दिले नाही दाणे

भुकेल्यांना


छतासंगे तुझी

भिंतही वांझोटी

पक्ष्यांची घरटी

मोडलीस


केलेस गाऱ्हाणे

ऊर बडवून

दिले उडवून

पाखरांना


तुला दिली साद

नित्य पाखरांनी

सांग त्यांची गाणी

ऐकली का?


जन्मभर किती

पाळले सोवळे

कशाला कावळे

पिंडासाठी


जरी नाही कधी

जीव तू लावला

तरी तो कावळा

शिवलाच


शिवता कावळा

मोक्षप्राप्ती झाली

कीव तुझी आली

मुक्या जीवा


सखा म्हणे लाव

पाखरांना प्रीती

तोडू नका नाती

जन्मभर!

No comments:

Post a Comment