Thursday, 9 July 2015

Inspiration : सिव्हिल इंजिनिअर झाला शेतीचा ‘ब्रॅंड अॅम्बॅसिडर’

Thanks to esakal.

यशस्वी लोक वेगळं काही करण्यापेक्षा आहे तेच काम वेगळ्या पद्धतीने करतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे मुखई (ता. शिरूर) येथील दीपक हिरवे हे युवा शेतकरी. सिव्हिल इंजिनिअर म्हणून इमारतींचे इमले उभे करण्याऐवजी त्यांनी चार वर्षांपूर्वी राज्यात सर्वप्रथम ‘सबरफेस’ तंत्रज्ञान वापरून उसाचे एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन केले. या कर्तृत्वावर ते आता ‘फिनोलेक्‍स’ कंपनीचे ‘ब्रॅंड अॅम्बॅसिडर’ म्हणून देशभर फिरत आहेत.


शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्टा म्हणजे नेहमीच दुष्काळी. या परिसरातील मुखई म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांचे गाव. मात्र सन २००० च्या दरम्यान ‘चासकमान’च्या कालव्याचे पाणी या भागात फिरले आणि या भागातील शेतकऱ्यांचे नशीबही पालटले. पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सन १९९६ ते २००० या दरम्यान ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुखई येथील दीपक साहेबराव हिरवे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी पत्करली. मात्र कालव्याचे पाणी आल्यामुळे आपण शेतीतच ‘करिअर’ करू, असा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी गावाकडे वडील आणि प्रकाश व संतोष या दोन भावांच्या मदतीने सर्व प्रथम पाटबंधारे खात्याकडून पाणी उचल परवानगी घेतली. दहा लाख कर्ज घेऊन त्यांनी जवळपास ३.५ किलोमीटरवरून आपल्या शेतात पाणी आणले. 

या पाण्याच्या जोरावर पहिल्या वर्षी हळदीचे पीक घेतले. मात्र यात तोटा झाला. त्यामुळे पुढील वर्षी ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पारंपरिक पद्धतीने शेती करीत पुढील सात वर्षे दीपक यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग केले. मात्र सन २०११ मध्ये त्यांनी जिल्ह्यातील शेती तज्ज्ञ, ‘अॅग्रोवन’, ‘सकाळ’ची प्रगती पुरवणी आणि इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील कृषी घडामोडींची माहिती संकलन केली. त्याच्या आधाराने आपल्या शेतात सबरफेस तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. जमिनीखालून ठिबक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या या नवीन तंत्रज्ञानावर त्यांनी पहिल्याच वर्षी ‘बेड’ पद्धतीने ऊस लागवड केली. या प्रयोगाची त्यांना धास्ती होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एकरी १०० टनांपेक्षाही जास्त उत्पादन घेतले. 

त्यांच्या या प्रयोगाचे परिसरात आणि शासनाच्या कृषी विभाकडूनही कौतुक झाले. त्यांचा हाच प्रयोग पाहायला मग राज्यभरातून अनेक शेतकरी येऊ लागले. अर्थात, या संपूर्ण तंत्रज्ञानात त्यांनी पाइप क्षेत्रात नावाजलेली ‘फिनोलेक्‍स’ कंपनीचे काही साहित्य वापरले. कंपनीच्या सर्वच प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेताला भेटी दिल्या. सबरफेस तंत्रज्ञानाचा प्रयोग आणि ‘फिनोलेक्‍स’च्या या पुढील कृषी संशोधनासाठी चांगल्या नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोधासाठी दीपक हिरवे हे ‘फिनोलेक्‍स’चे ‘ब्रॅंड अॅम्बॅसिडर’ झाले. त्यातून ते संपूर्ण देशभरात चमकले.

सबरफेस तंत्रज्ञानाने ठिबक करीत असताना त्यांनी ‘बेड’ पद्धतीने ऊस लागवड केली असली; तरी पूर्ण शेती कमी मनुष्यबळात व्हावी, म्हणून त्यांनी दहा फुटांच्या पट्टा पद्धतीने लागवड केली. त्यामुळे मशागतही अत्यंत सुलभ झाली. सिव्हिल इंजिनिअर म्हणून इमारतींच्या जंजाळात अडकण्यापेक्षा दीपक हिरवे यांनी शेतीत दाखविलेली निष्ठा त्यांना एवढी कामाला आली, की १४ एकर शेतीत आणखी १४ एकराची भर केवळ शेती उत्पन्नावर पडली.

पाणी वितरण केंद्रित पद्धतीने
आता दीपक हिरवे यांनी सर्व एकूण २८ एकराला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी कल्पकता वापरली आहे. त्यासाठी त्यांनी पाणी वितरण केंद्रित 
पद्धतीने सुरू केले आहे. त्यात संपूर्ण २८ एकरांतील पाइपलाइन एका ठिकाणाहून नियंत्रित करता येईल, अशी यंत्रणा कार्यान्वित केली. यासाठी त्यांना १० लाखांचा खर्च आला; तरी भविष्यातील कितीतरी कष्ट आणि मनुष्यबळ त्यांनी या निमित्ताने वाचविले. 

शेतात २५ केव्हीए क्षमतेचे जनरेटर 
विजेच्या अनियमिततेवरही त्यांनी नामी उपाय शोधत २५ केव्हीए क्षमतेचा साडेचार लाख रुपयांचा एक जनरेटरच शेतात बसविला. यामुळे कुठल्याच अडथळ्यांशिवाय २८ एकर शेतीतील ऊस उत्पादन काढणे शक्‍य झाले. लवकरच ‘फिनोलेक्‍स’ त्यांना इस्राईलच्या तंत्रज्ञानाची ‘गॅलकॉन’ कंपनीची सुमारे ३० लाख रुपये किमतीची ‘टोटल फर्टिमिक्‍स ऑपरेटिंग सिस्टिम’ शेतात बसवून देत आहे. त्यामुळे माती परीक्षण करून २८ एकरांचे वेगवेगळे विभाग केले. सर्व शेतात संगणकीय नियंत्रणाने व स्वयंचलित पद्धतीने खत वितरण लवकरच सुरू होणार आहे. संपूर्ण पुणे जिल्हा तसेच कर्नाटक व गुजरात तसेच ऑस्ट्रेलियातील अनेक शेतकऱ्यांनी दीपक यांच्या नवीन प्रयोगांना आवर्जून भेटी देऊन कौतुक केले.

दीपक यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करून शेती यशस्वी केली. पुढे शेती पाहून गावकीच्या राजकारणात केवळ सात सदस्यीय ग्रामपंचायतीत स्वत: आणि पत्नी विद्या एकाच वेळी ग्रामपंचायत सदस्य झाले. मागील वर्षी हा गडी मुखई गावाचा सरपंचही झाला. आता राजकारणातून निवृत्ती घेऊन फक्त शेती विकास, हाच ध्यास घेण्याचा निश्‍चय केला आहे. 

‘‘बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची भेट आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली. पत्नी विद्या, मोठा भाऊ प्रकाश तसेच लहानगा संतोष यांच्या पाठबळावरच आणि फिनोलेक्‍स कंपनीच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचलो.’’

(दीपक हिरवे यांचा संपर्क क्रमांक ः ९९७०३ ९७६३३)

No comments:

Post a Comment