Friday, 18 November 2022

Celebrating 62 B'day

 विद्या धुपकर ने माझ्या एकसष्टीसाठी कविता केली,

प्रेमाने, असलेले नसलेले गुणदर्शन केले, आम्ही भरुन पावलो.


राजेश मोराणकर 

आहे खूप महान 

कल्पना ऋतुजा रसिकाचा 

आहे तो अभिमान 


आवडे त्याला शेरोशायरी 

कविता आणि गाणी 

युट्युब आणि ब्लॉगवर 

भारीच चालते त्याची वाणी


 फिटनेस फंडा त्याचा 

आहे खूपच न्यारा 

रनिंग सायकलिंग, बापरे 

ऐकूनच आमचे वाजतात बारा 


एकसष्ठी केलीस पूर्ण आज 

तरी इतका उत्साह? 

सांगशील का आम्हाला 

काय आहे त्याचं राज 


राजेशचा राज असो काहीही 

आहेस भलताच भाग्यवान 

कल्पना सारखी जोडीदार 

सुयोग्य पडलंय दैवी दान 


असाच राहा कायम 

तुझ्याच मस्तीत जगत 

ऋतुजा रसिकाच्या रूपाने 

कीर्ती राहीलच गाजत 


खूप खूप शुभेच्छा तुला

 मिळो आयुष्य उदंड 

फिट न फाईन असाच राहा 

त्यातच दडलय सुख प्रचंड

-विद्या धुपकर

-------------------------*--------*-------------------

भावाने कविता केली

साठ आणि एकसष्ठ आकडे आहेत नुसते

मनाच्या तारुण्यापुढे त्याला कोण पुसते

आकडे वाढतील वाढू दे

हात पाय नाडतील नाडू दे

कशाला टेन्शन गोळा करायचे

खुशाल काना डोळा करायचे

आपल्याला हवं, तस्स करायचं

लोकांच बिंदास हस्स करायचं

सगळ्यांना हेवा वाटायला हवा

तृप्तीचा ठेवा साठायला हवा

खुशालचेंडू लोकांचे

तारुण्य नेहमी मुसमुसते

साठ आणि एक्सष्ठ आकडे आहेत नुसते

मनाच्या तारुण्यापुढे त्याला कोण पुसते


उगाच पोक्त व्हावे कशाला

उपदेशांचे डोस द्यावे कशाला

स्वतःच म्हातारे का बनून फिरावे

हेकटपणाला ताणून धरावे

मग इस्पितळात न्यावेच लागणार

काठीचे आधार घ्यावेच लागणार

मग एक दिवस

नको ते होऊन बसते

साठ आणि एक्सष्ठ आकडे आहेत नुसते

मनाच्या तारुण्यापुढे त्याला कोण पुसते


वय वाढायला काही करावे लागते?

कुठले मोठे रण मारावे लागते?

आपले आपण तर वाढत जाते!

कॅलेंडरची पाने फाडत जाते!

मनाचे तारुण्य कला आहे

नाहीतर वय ही बला आहे

आपण मनाने कसे असतो

तेच चेहेऱ्यावर दिसते

साठ आणि एक्सष्ठ आकडे आहेत नुसते

मनाच्या तारुण्यापुढे त्याला कोण पुसते


त्याच्या प्रमाणे मस्त रहावे

व्यायामाने तंदुरूस्त रहावे

आतून गाणी गात रहा

जे हवे ते खात रहा

हेवे दावे हवे कशाला

खुशीची झोप कायम उशाला

वाचन कर लेखन कर

ज्ञान कणांचे वेचन कर

राजा प्रमाणे कसे जगावे

ते आम्ही तुझ्यात बघावे

दुनियाची तू सैर कर

कधी न कुणाशी वैर धर

तुझ्यात सरस्वतीचा वास

सर्जनशीलतेचा ध्यास

महालक्ष्मी तर घरीच असते

तिची साथ तर न्यारीच असते

आंनदयात्री च्या आयुष्यात

कधी दैव ना रुसते

साठ आणि एक्सष्ठ आकडे आहेत नुसते

मनाच्या तारुण्यापुढे त्याला कोण पुसते

.....संजय मोराणकर

-----------------------*-----*-------------------

दोन्ही कविता वाचून आम्ही भरुन पावलो, किती प्रेम करतात या यत्किंचीत पामरासाठी कविता वगैरे.... आम्हीही एक कविता रचली....

घ्या कविता



झाली एकसष्टी

का व्हावे कष्टी?!


 पूल 'साठी'चा पार

 कुटूंबाला ना भार

 मुली,जावयांचा आधार

 ना हव्यास ना thirsty

झाली एकसष्टी

का व्हावे कष्टी?!


अजून करा काम

नको तो आराम

कधी मित्रांसह जाम

शरीर रोगांची ना वस्ती

झाली एकसष्टी

का व्हावे कष्टी?!



काका /मामा पंचाऐशी

जणू DNA ची कथाऐसी

'राज-फकीरी' वृत्ती कैसी

आभार निसर्ग-सृष्टी

झाली एकसष्टी

का व्हावे कष्टी?!


उडवा खयाली पतंग

लेखनाचा काही रंग

मिताली चा साथ-संग

एक जबाबदार हस्ती

झाली एकसष्टी

आता करा मौजमस्ती.

# राजेश्वर


----------------------*------*-----------------

No comments:

Post a Comment