Tuesday, 17 February 2015

वेगळ्या वाटेने "हरियाली'ची हरितवाट" सविता अमर

वेगळ्या वाटेने



"हरियाली'ची हरितवाट

सविता अमर

Saturday, December 17, 2011 AT 12:00 AM (IST)

Tags: सकाळ साप्ताहिक

"थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली ऍन्ड ऍक्‍ट लोकली' हे ब्रीद आहे ठाण्याच्या "हरियाली' या संस्थेचे! पर्यावरणाच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे काम करणाऱ्या या संस्थेने रचनात्मक कामाची वेगळी वाट चोखाळली आहे. कोणत्याही सरकारी योजना किंवा आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता केवळ श्रमदान आणि टाकाऊतून टिकाऊ या तंत्राचा वापर करीत "हरियाली'ने ठाणे व मुंबई परिसरातील पर्यावरण "जिवंत' ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.
प्रत्येकाने आयुष्यात एक तरी झाड लावावे, असे म्हणतात. अलीकडे काही वर्षांत झालेला वृक्षारोपणाचा प्रसार बघता झाडे लावून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्याचे हे समाधान मिळवू इच्छिणाऱ्यांची संख्याही बरीच वाढली आहे; पण वृक्षारोपण म्हटले, की काही प्रश्‍न हमखास पडतात. कुठली झाडे निवडायची? ती कधी आणि कुठे लावायची? त्यांची रोपे कुठून मिळवायची? सार्वजनिक ठिकाणी झाड लावताना परवानगी कोणाची घ्यायची? लावलेल्या रोपांचे नंतर रक्षण कसे करायचे? वगैरे. तुम्हाला एक झाड लावायचे असो वा हजार, हे प्रश्‍न असतातच आणि याबद्दल पुरेशी माहिती लोकांना नसते आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याची इच्छा हवेतच विरून जाते.

या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे काम करणाऱ्या "हरियाली' या संस्थेची दखल घ्यावी लागते ती त्यामुळेच. मोठ्या प्रमाणातल्या वृक्षारोपणासाठी जागा शोधण्याचे काम करणारी ठाणे व मुंबई परिसरातील एकमेव संस्था, ही "हरियाली'ची महत्त्वाची ओळख.

उजाड डोंगर, माळरान, जलवाहिन्या, रस्ते इत्यदींची पाहणी करणे. कुठे, किती आणि कोणत्या प्रकारचे वृक्ष लावता येतील याचा अंदाज घेणे. संबंधित अधिकाऱ्याची रीतसर परवानगी घेणे, तिथे लावण्यासाठी रोपे पुरवणे हे "हरियाली'चे काम. वृक्षलागवडीसाठी येणारा खर्च संस्था स्वतःच उभा करते. त्यासाठी कुठल्याही सरकारी योजना किंवा अन्य निधीचा आधार घेतला जात नाही हे विशेष!

"हरियाली'च्या या रचनात्मक कामाचे बीज सर्वप्रथम रुजले ते पूनमचंद सिंगवी यांच्या मनात. पूनमचंद मूळचे धुळ्याचे. लहानपणापासूनच सार्वजनिक कामात रमणारे. व्यवसायानिमित्त मुंबईत आल्यानंतरही अनेक समाजोपयोगी कामांत त्यांनी पुढाकार घेतला. 1980मध्ये मुलुंड जिमखान्याची स्थापना झाली ती त्यांच्याच प्रयत्नांतून.
मनासारखे काम करता यावे म्हणून पूनमजींनी व्यवसायातून काही काळानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते 1995च्या सुमारास ठाण्यातल्या "फ्लॉवर व्हॅली'त वास्तव्यास आले. त्यांच्या घरातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरातल्या कोकणीपाडा डोंगराचे हिरवेगार दृश्‍य दिसत असे. तो नोव्हेंबर महिना होता. नंतर मात्र गवत वाळू लागले, तसा हळूहळू डोंगर पिवळा पडू लागला. मग तिथे आगी, वणवे लागायला सुरवात झाली. एप्रिल-मेपर्यंत तर तो हिरवागार डोंगर अगदीच उजाड आणि बोडका झाला. काही महिन्यांपूर्वी नेत्रसुखद वाटणारे दृश्‍य आता डोळ्याला खुपायला लागले. मात्र इथेच पूनमजींना त्यांचा पहिला "प्रोजेक्‍ट' सापडला.

लगेचच त्यांनी या डोंगराची पाहणी केली आणि त्याचे पुनरुज्जीवन कसे करता येईल यावर विचारमंथन सुरू झाले; पण हे काम एकट्याचे नव्हते. पूनमजींनी त्यांच्या उद्योगी स्वभावानुसार काही समविचारी माणसे गोळा केली. विचारविनिमयानंतर वृक्षलागवड करायचे ठरले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनअधिकाऱ्याला भेटून त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली आणि त्यांची रितसर परवानगी घेतली. सारे कामाला लागले. थोड्याच दिवसांत खरोखर आश्‍चर्यकारकरीत्या या डोंगराचा कायापालट झाला. उजाड डोंगर पुन्हा हिरवा दिसू लागला. हा चमत्कार पाहून पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे हजारो लोक स्वयंस्फूर्तीने पुढे आले. प्रसारमाध्यमे तसेच ठाणे महानगरपालिकेलाही या प्रकल्पाची दखल घ्यावी लागली. ठाणे महापालिकेने तर उपवन तलावाची जबाबदारी पूनमजींकडे सोपवली. त्यातूनच 1996 मध्ये "हरियाली' या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून गेली 15 वर्षे संस्था "थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली ऍन्ड ऍक्‍ट लोकली' (विचार करा विश्‍वाचा, नियोजन करा राष्ट्राचे आणि काम करा स्थानिक परिसरात) हे ब्रीद घेऊन कार्यरत आहे.

आपल्या परिसरातील वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया गोळा करण्यापासून "हरियाली', वृक्ष लागवडीची सुरवात करते. लोक आंबे खातात, कोयी फेकून देतात. जांभूळ, बोर, सिताफळ अशी फळे खाऊन त्यांच्यादेखील बिया कचऱ्यात टाकून दिल्या जातात. त्या बिया "हरियाली' गोळा करते. लोकांना त्या आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन करते. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या फुलांच्या बियादेखील गोळा केल्या जातात. सध्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांकडूनही बांबू, करंज, बेहेडा, जांभूळ अशा अनेकविध झाडांच्या बिया गोळा केल्या जातात. त्यासाठी विशिष्ट मोबदलाही त्यांना दिला जातो.

पावसाळ्यात सुरवातीला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निसर्गप्रेमी लोकांना बरोबर घेऊन ठाण्यातील जवळपासच्या डोंगरांवर या गोळा केलेल्या बियांची नुसती पखरण करीत पेरणी केली जाते. हे काम शनिवार-रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी केले जाते. दरवर्षी पावसाळा सुरू होताना "एक तरी रुजवावी बी' असे आवाहन पूनमचंद सिंगवी लोकांना करतात. या आवाहनाला लोकांच्या वाढत्या सहभागाने आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

संस्थेचे या क्षेत्रातील निरलस काम पाहून ठाणे महानगरपालिकेने संस्थेला रोपवाटिकेसाठी वडखळ इथे एक जागा उपलब्ध करून दिली आहे. संस्थेची मुलुंड इथेही एक स्वतंत्र नर्सरी आहे. सावर, गुलमोहर, आंबा, आवळा, चिंच, बेहडा, अशोक अशी 30 ते 40 प्रकारची जवळपास 25 हजारांहून अधिक रोपे "हरियाली'कडे आज लागवडीसाठी तयार आहेत. वृक्षप्रेमींना या रोपांचे विनामूल्य वाटप केले जाते. वृक्षलागवडीच्या वेळी "हरियाली'चे प्रतिनिधी त्यांना खड्डे किती खोल खणायचे, पाणी कधी, किती घालायचे याबाबत मार्गदर्शनही करतात.

टाकाऊतून टिकाऊ या तंत्राचा वापर करत नर्सरीतील रोपे तयार करण्यासाठी संस्था घराघरातून कचऱ्यात अथवा भंगारात देण्यात येणाऱ्या दुधाच्या रिकाम्या पिशव्यांचा उपयोग करते. याचप्रकारे पर्जन्यजल संवर्धनासाठी छोट्या-मोठ्या ओढे-नाल्यांवर बांध घालणे, दगड काढून झालेल्या ओस खाणींचे जलाशयात रुपांतर करणे ही कामेही संस्था, स्वतःच विकसित केलेल्या सोप्या पद्धतीने करत असते.

बीजसंकलन, त्याचे वाटप आणि रुजवण व्यापक प्रमाणावर करण्यासाठी "हरियाली'ने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांबरोबरच वारकरी, शिर्डीला पायी चालत जाणारे साईभक्त अशा वेगवेगळ्या माध्यमांचा चांगला उपयोग करून घेतला आहे. वारकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटींहून अधिक बियांचे वाटप आणि रुजवण "हरियाली'ने केले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 19 ते 21 मार्च 2008 या काळात केलेल्या पाहणीत, वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी केलेल्या कारंज, कडुनिंब, शेवगा आदी वृक्षाच्या बियांनी रुजून आलेली सुमारे 2 ते 3 वर्षांची रोपे दिसून आली. संस्थेची ही संकल्पना आता महाराष्ट्राबरोबरच गुजरात, केरळ, कर्नाटक इत्यदी राज्यांतदेखील मूळ धरू लागली आहे.

आज "इन्फ्रास्ट्रक्‍चर' हा सर्वत्र परवलीचा शब्द बनला आहे. त्याचा मूलाधार रस्ता असल्याने रस्तेविकासाला प्रचंड वेग आला आहे. हे करताना वृक्षांची तोड व त्यामुळे पर्यावरणाची हानी अपरिहार्यपणे आलीच; पण या दोन्ही परस्परविरोधी टोकांच्या भूमिकेतून सुवर्णमध्य काढण्याच्या उद्देशाने "हरियाली'ने जून 2010 मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 (आग्रा रोड) ठाणे ते धुळे या 350 कि.मी. परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अडथळा येणार नाही अशारितीने बिया रुजवण्याचे अभियान हाती घेतले. त्यासाठी पाहणी दौरा, स्थानिक मंडळींशी संपर्काची फेरी पूर्ण केली. महामार्गालगतची गावे, शहरे, वस्त्यांमधील रहिवासी, तसेच निसर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, लहानमोठे उद्योगसमूह, वनसमित्या या सर्वांच्या सहभागातून हे अभियान व्यापक स्तरावर राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत महामार्गालगतच्या वनक्षेत्राचाच वापर करत तिथे गिरिपुष्प, रेन-ट्री, चिंच, मोह, करंज, बहावा, वड, पिंपळ अशा जवळपास दहा लाख बियांचे वाटप व रुजवण "हरियाली'ने केले. केवळ विरोधासाठी विरोध किंवा सरकारी धोरणांवर टीकाटिपण्णी करत बसण्यापेक्षा लोकसहभागातून काय चमत्कार घडू शकतो, याचे हे एक नमुनेदार उदाहरण ठरावे.

यंदाच्या पावसाळ्यात "हरियाली'ने एक प्रयोग केला. नोव्हेंबर महिन्यातील एका आगीत त्या क्षेत्रात लावलेल्या सुमारे सोळा हजार रोपांची होरपळ झाली. या घटनेनंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना आवाहन करून पिण्याच्या रिकाम्या बाटल्या विनामूल्य गोळा केल्या. त्याला वर-खाली छिद्रे पाडण्यात आली. नव्याने लावलेल्या; पण जळीत अवस्थेतील प्रत्येक रोपाजवळ एकेक बाटली ठेवण्यात आली. थेंब थेंब मिळणाऱ्या या संजीवनीमुळे आणि त्यामागच्या तळमळीतून या झाडांनी आता जीव धरला आहे. त्यांच्या बुंध्यातून आणि वरच्या डोळ्यांमधून छोटे छोटे कोंब फुटायला सुरवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी आगीत भस्मसात झालेला हाच डोंगर आता "बाटलीचा डोंगर' या नावाने ओळखला जातो.

पिसे जलाशयाच्या रस्त्यावरील एका डोंगरावरही "हरियाली' व ठाणे वनविभागाचा संयुक्त वनविकास प्रकल्प आकार घेत आहे. गेल्या तीन वर्षांत या डोंगरात विविध प्रकारच्या सुमारे 25 हजार झाडांची लागवड करण्यात आली असून 4 जलाशय, 20 हरियाली बंधारे आणि समांतर पातळीवरचे सुमारे 800 चर खणून पर्जन्यजलाचे अतिशय सुंदर नियोजन याठिकाणी करण्यात आले आहे.

लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून असे अनोखे प्रयोग राबवत असताना आर्थिक नियोजन कसे केले, असे विचारल्यावर सिंगवी सांगतात, ""मूळात विधायक, रचनात्मक कामांसाठी लोक स्वतःहून मदत करायला तयार असतात. फक्त त्यांचा तुमच्या कामावर, प्रामाणिकपणावर विश्‍वास बसला पाहिजे.''

"हरियाली'ने हा विश्‍वास प्रथमपासून सार्थ ठरवला. म्हणूनच संस्थेला कधीही निधीची कमतरता भासली नाही. नागरिक व संस्था यांच्याकडून मिळणाऱ्या स्वेच्छा देणग्या आणि सभासद फी यातून मिळणाऱ्या आवश्‍यक निधीतून "हरियाली'च्या कामाचा विस्तार होत गेला. आज ठाणे व परिसरातील पन्नासाहून अधिक शाळा-महाविद्यालये, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास 20 संस्था; तसेच 25 हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या आज "हरियाली'शी जोडल्या गेल्या आहेत.

"हरियाली'चे काम हे सध्या ठाणे व मुंबई परिसरापुरते मर्यादित असले, तरी ते अनेक शहरांसाठी मॉडेल ठरू शकते, हे नक्की!

No comments:

Post a Comment